105
इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार 
निर्ग. 7:8-10; 1 इति. 16:8-22 
 1 परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. 
राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. 
 2 त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; 
त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; 
 3 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. 
जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. 
 4 परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. 
त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या. 
 5 त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, 
त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. 
 6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, 
तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो, 
 7 तो परमेश्वर आपला देव आहे. 
त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत. 
 8 तो आपला करार म्हणजे 
हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो. 
 9 त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. 
आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली. 
 10 ही त्याने याकोबासाठी नियम, 
आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला. 
 11 तो म्हणाला, “मी तुला कनान देश 
तुझा वतनभाग असा म्हणून देईन.” 
 12 हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, 
होय फार थोडे, आणि देशात परके होते. 
 13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, 
आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले. 
 14 त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; 
त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली. 
 15 तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, 
आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका. 
 16 त्याने त्या देशात दुष्काळ आणला. 
त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. 
 17 त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; 
योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. 
 18 त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; 
त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. 
 19 त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, 
परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. 
 20 तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; 
लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. 
 21 त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, 
आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले, 
 22 अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, 
आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे. 
 23 नंतर इस्राएल मिसरात आले, 
आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. 
 24 देवाने आपले लोक फारच वाढवले, 
आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले. 
 25 आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, 
आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले. 
 26 त्याने आपला सेवक मोशे 
आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. 
 27 त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, 
हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली. 
 28 त्याने त्या देशात काळोख केला, 
पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही. 
 29 त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले 
आणि त्यांचे मासे मरण पावले. 
 30 त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, 
त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते. 
 31 तो बोलला, आणि गोमाशा व उवा 
त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या. 
 32 त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने 
गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला. 
 33 त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. 
त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली. 
 34 तो बोलला आणि टोळ आले. 
असंख्य नाकतोडे आले. 
 35 टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, 
त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले; 
 36 त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, 
त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले. 
 37 त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; 
त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही. 
 38 ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, 
कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती. 
 39 त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, 
आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला. 
 40 इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, 
आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले. 
 41 त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; 
ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले. 
 42 कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, 
आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. 
 43 त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, 
त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले. 
 44 त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; 
त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. 
 45 ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम 
आणि आपले नियमशास्त्र पाळावे. 
परमेश्वराची स्तुती करा.